The news is by your side.

व्यावसायिक सांवल यांचा मुलगा अमितची आत्महत्या की घातपात

0 27

बेपत्ता अमितचा मृतदेह सापडला महान धरणात

अकोला :दत्त मेडिकलचे संचालक जयप्रकाश जीवनलालजी सांवल यांचा मुलगा अमित हा सोमवारी संध्याकाळपासून बेपत्ता होता. सर्वत्र त्याचा शोध सुरु असताना अचानकपणे महान धरणात गुरुवारी त्याचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. अमितने आत्महत्या केली की घातपात असा प्रश्न उपस्थित झाला असून पोलिसांनी अमितच्या मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
सोमवारी संध्याकाळी साडेसहा वाजता पासून अमित हा बेपत्ता होता. सात वाजताच्या दरम्यान अमितची बहिण कोमलने त्याला फोन केला असता त्याने रडत रडत मी महान धरणावर असल्याचे सांगितले होते व फोन कट केला होता. तेव्हापासून सांवल कुटुंब हादरले आणि त्यांनी थेट महान धरण गाठले. तेथे अमितची दुचाकी व चप्पल दिसून आली. तेव्हाच अमितने धरणात उडी घेतली असावी अशी शंका आली. मंगळवारी सकाळीच धरणात शोधमोहीमही राबवली मात्र अमित दिसून न आल्याने तो तेथून दुसरीकडे निघून गेला असावा व सुरक्षित असावा, असा विश्वास अमितच्या कुटुंबियांना आल्याने त्यांनी इतरत्र त्याचा शोध सुरु केला होता. तसेच मंगळवारी अमितचे वडिल जयप्रकाश सांवल यांनी अमितच्या मित्रांवर संशय घेत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी काही मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तसेच संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफडे यांच्या नेतृत्वात शोधमोहीम मंगळवारपासून अहोरात्र सुरु होती. मात्र गुरुवारी सकाळी अमितचा मृतदेह धरणात आढळून आला आणि सांवल कुटुंबियांच्या पायाखालची वाळूच सरकली. अमितचे शवविच्छेदन केल्यानंतर रात्री अमितवर अंत्यसंस्कार पार पडले.

मैत्रिणीसोबत दोन दिवस होता बेपत्ता
अमितचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. ९ सप्टेंबर रोजी अमित, करीश्मा शर्मा, मित्र इर्शाद उर्फ बल्लू, स्वाती राठोड असे चौघे महाकाली हॉटेल येथे बसले होते. त्यानंतर अमित बेपत्ता झाला होता. त्यानंतर दोन दिवस तो बेपत्ता होता. त्याच्या मित्रावर दबाव आणल्याने त्यांनी तो मैत्रिणीसोबत असल्याचे सांगितले होते. तेव्हा मित्रांच्या माध्यमातून त्याला घरी आणण्यात यश आले होते.

प्रेमसंबंधाची किनार
अमित आणि त्याची मैत्रिण हे काही दिवसांपूर्वी चिलखदरा येथे गेले होते. तेथे त्याच्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. तेव्हापासून अमित तणावात असावा, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

घरून चोन्याची चेन घेवून गेला होता
अमित हा सोमवारी संध्याकाळी सहा वाजता घरून त्याच्या पत्नीकडून सोन्याची चेन घेवून गेला होता. तो परत आलाच नाही. त्यामुळे अमित हा कुणाच्या ब्लॅकमेलिंगचा शिकार झाला की आणखी दुसरे कारण आहे. त्याने आत्महत्या केली की, घातपात असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. पोलिस या प्रकरणाची चौकशी करीत आहे.