The news is by your side.

देवेंद्र फडणवीस यांना सत्तास्थापनेसाठी आमंत्रण!

0 10

११ नोव्हेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करावे लागणार

प्रतिनिधी/९ नोव्हेंबर
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचे विधिमंडळ पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले आहे. राज्यपालांनी फडणवीस यांना सत्तास्थापनेसाठी आमंत्रण देतानाच ११ नोव्हेंबरपर्यंत (सोमवार) बहुमत सिद्ध करण्यासही सांगितले आहे. हे आमंत्रण फडणवीस स्वीकारणार का? बहुमताच्या अग्निपरीक्षेला ते सामोरे जाणार का, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, सत्ता स्थापन करायची की नाही, याचा निर्णय उद्या, रविवारी भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत घेतला जाईल, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल २४ ऑक्टोबर रोजी जाहीर झाले. त्यात भाजप हा १०५ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला तर शिवसेना ५६ जागांसह दुसNया क्रमांकावर राहिला. हे दोन्ही पक्ष महायुतीने निवडणुका लढले होते; मात्र निकालानंतर अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदावरून या दोन्ही पक्षांत संघर्ष सुरू झाला. शिवसेना अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम राहिल्याने व भाजपने ही मागणी सपशेल फेटाळून लावल्याने या सत्तासंघर्षाने कळस गाठला. देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर थेट आणि टोकाचे वार केले. लोकसभा निवडणुकीवेळी भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी दिलेल्या वचनाची आठवण करून देत उद्धव यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. शहा आणि कंपनी खोटे बोलत आहे आणि खोटारड्यांंशी मी मैत्री ठेवत नाही, असे उद्धव म्हणाले. या संघर्षाचा अद्याप शेवट झालेला नसला व युती तुटलेली नसली तरी हे दोन्ही पक्ष लगेचच एकत्र येतील अशी सुतराम शक्यता नाही. या स्थितीत राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्तास्थापनेचे आमंत्रण दिल्याने पुढे काय होणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. फडणवीस यांनी शुक्रवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला. तो मंजूर करत राज्यपालांनी नवी व्यवस्था होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्यास फडणवीस यांना सांगितले. त्यानुसार फडणवीस सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत. आता राज्यपालांनी दिलेले सत्तास्थापनेचे आमंत्रण भाजप स्वीकारणार का?, हा कळीचा प्रश्न आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्तास्थापनेचे आमंत्रण मिळणे अपेक्षितच होते; मात्र आजच्या घडीला भाजप बहुमतापासून फार दूर आहे. त्यामुळे हे आमंत्रण स्वीकारून सत्तास्थापन केल्यास बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान भाजपपुढे असेल. त्यासाठी भाजपच्या हातात दोन दिवसांचाच अवधी असणार आहे.