The news is by your side.

मंत्रिमंडळ विस्तार ३ किंवा ४ डिसेंबरला; १४ नवे मंत्री घेणार शपथ?

0 129

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मोठ्या मताधिक्क्याने जिंकल्यानंतर आता सर्वांच्या नजरा राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावर लागल्या आहेत. डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असून या विस्तारात आणखी १४ मंत्र्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते, असे सूत्रांनी सांगितले. शिवतीर्थावर झालेल्या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर शिवसेनेचे विधिमंडळातील गटनेते एकनाथ शिंदे, शिवसेना नेते सुभाष देसाई, राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात, विदर्भातील नेते नितीन राऊत यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली होती. या दिमाखदार सोहळ्यानंतर विधानसभेतील विश्वासदर्शक ठरावावर सगळ्यांच्या नजरा होत्या. आज या अग्निपरीक्षेत उद्धव ठाकरे सरकार मोठ्या मताधिक्क्याने उत्तीर्ण झाले. बहुमतासाठी १४५ हा जादुई आकडा असताना महाविकास आघाडीकडे १६९ आमदारांचं बळ असल्याचंही यामुळे स्पष्ट झालं. ठाकरे सरकारने विधानसभेत बहुमताचा सामना एकतर्फी जिंकल्यानंतर आता ठरलेल्या अन्य बाबी प्रत्यक्षात उतरवण्याची लगीनघाई सुरू झाली आहे. त्यानुसारच डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात ३ किंवा ४ डिसेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांत खातेवाटपावरही एकमत झाल्याची खात्रीशीर सूत्रांची माहिती आहे. त्यात नगरविकास, गृहनिर्माण, सिंचन आणि परिवहन ही खाती शिवसेनेकडे; गृह, अर्थ, पर्यावरण आणि वन मंत्रालये राष्ट्रवादीकडे तर महसूल, सार्वजनिक बांधकाम आणि अबकारी खातं काँग्रेसकडे जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व नव्या सरकारमधील मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मात्र येत्या दोन दिवसांत खातेवाटपावर अंतिम निर्णय होईल, असे सांगितले.