The news is by your side.

भाजपविरुद्ध गोवा विकास आघाडी? गोव्यातही लवकरच राजकीय भूकंप!

0 17

प्रतिनिधी/३० नोव्हेंबर
मुंबई: महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महाराष्ट्र विकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होऊन ही आघाडी सत्तेत विराजमान झाली असतानाच या आघाडीने आता गोव्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. गोव्यात चमत्कार घडेल, असा दावा करणारे शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा ट्विट करून गोव्यात भाजप विरोधी आघाडी उभारण्याच्या दिशेने सकारात्मक पावले पडत असल्याचा दावा केला आहे.
गोव्यातील महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षही भाजप विरोधी आघाडीसाठी अनुकूल आहे. या पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर यांच्याशी माझं बोलणं झालं. गोव्यात भाजप विरोधी आघाडी निर्माण करण्याचा जो प्रस्ताव शिवसेनेने दिला आहे, त्याबाबत मी सकारात्मक आहे, असे खुद्द ढवळीकर यांनी आपल्याला सांगितल्याचे राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाही गोव्यातील या संभाव्य प्रयोगाला पाठिंबा असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे. पवार यांच्या खास मर्जीतील नेते प्रफुल्ल पटेल यांनी राऊत यांच्या भूमिकेवर अनुकूलता दर्शविली आहे. गोव्यातही भाजप विरोधात सर्व पक्षांनी एकत्र येण्याची ‘हीच ती वेळ’ अशी भूमिका पटेल यांनी घेतली आहे. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन भाजपविरुद्ध महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन केली तशीच महाआघाडी येत्या काळात गोव्यात स्थापन करून भाजपला सत्तेवरून खाली खेचण्याची गरज आहे, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले. गोव्यात नवी आघाडी स्थापन करण्याबाबत प्राथमिक चर्चा सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांत आम्ही प्रमुख नेते गोव्यात जाणार आहोत. तिथे सर्वांंची संयुक्त बैठक होईल व त्यात विस्ताराने चर्चा करण्यात येईल. गोव्याच्या हिताचा एक समान किमान कार्यक्रम बनवून पुढे जाता येईल, असेही पटेल यांनी पुढे नमूद केले. दरम्यान, शुक्रवारी गोवा फॉरवर्ड पार्टीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांनी मुंबईत येऊन महाविकास आघाडीच्या स्थापनेत निर्णायक भूमिका निभावणारे शिवसेना नेते संजय राऊत तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट घेतली. त्यानंतर राऊत यांनी गोव्यात राजकीय भूकंप होणार असल्याचं भाकीत केलं. विजय सरदेसाई व अन्य तीन आमदार शिवसेनेसोबत आघाडी करण्यास उत्सुक आहेत. अन्य काही आमदार आमच्या संपर्कात आहेत तसेच काही मंत्र्यांनीही संपर्क साधला आहे, असा दावा राऊत यांनी केला होता. त्यानंतर भाजपच्या गोटात चलबिचल वाढली आहे.