The news is by your side.

अकोल्याचे महापौर नंतर जातात राजकारणापासून दूर!

0 7

मनपाच्या महापौरांचे वैशिष्ट्य

( सुनील अवचार) /१डिसेंबर
अकोला: अकोला महानगरपालिका नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने राज्यात चर्चेचा विषय असते. असाच एक आगळावेगळा विषय आतापर्यंतच्या महापौरांच्या बाबतीत समोर आला आहे. अकोला महानगरपालिकेच्या आतापर्यंत झालेल्या सर्वच महापौरांचे एक वैशिष्ट्य समोर आले आहे, ते म्हणजे या पदावर आतापर्यंत जितक्या व्यक्ती विराजमान झाल्या त्या नंतर अल्पकाळातच आपोआपच राजकारणापासून दूर गेल्या आहेत!
उदाहरणच द्यावयाचे झाले तर अकोला महानगरपालिकेच्या पहिल्या महिला महापौर सुमनताई गावंडे याच फक्त पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर राजकारणात कार्यरत होत्या. परंतु शहरातील प्रॉपर्टी डिलर किसनराव हुंडीवाले यांची हत्या आणि बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात त्यांचे पती आणि पोलिस खात्यातून सहायक पोलिस निरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झालेले श्रीराम कजदन गावंडे यांच्यासह स्वत: सुमन गावंडे आणि त्यांच्या तीन मुलांविरुद्ध पोलिस आणि अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गुन्हे दाखल केले आहेत, त्यामुळे आता सुमन गावंडे यांचेही राजकीय अस्तित्व धोक्यात आले आहे. सुमन गावंडे यांच्यानंतर महापौर बनलेल्या अश्विनीताई हातवळणे यादेखील आज अकोल्याच्या राजकारणात कुठेही नाहीत. महापौर होण्यापूर्वी त्या शहरातील एका वृत्तवहिनीमध्ये निवेदिकेची भूमिका पार पाडीत होत्या, त्यावेळी त्यांचे अकोलेकरांना दर्शन तरी होत होते परंतु महापौर पदावरुन हटल्यानंतर त्यांचे आता मनपाच्या राजकारणात कुठेच अस्तित्व दिसत नाही. हातवळणे यांच्यानंतर काँग्रेस पक्षाचे मदन भरगड महापौर पदावर विराजमान झाले होते. त्यांनी नंतर मनपामध्ये विरोधी पक्षाची भूमिका बजावताना अनेक आंदोलने केली परंतु नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने त्यांनी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीकडून निवडणूक लढविली; मात्र त्यात त्यांना अपयश आल्याने आता त्यांचेही राजकीय अस्तित्व धोक्यात आले आहे. भरगड त्यांच्यानंतर सुरेश पाटील अकोल्याचे महापौर झाले. तेही महापालिकेच्या राजकारणात सध्या कोठेच दिसत नाहीत. त्यांच्यानंतर महापौरपदी विराजमान झालेल्या ज्योत्स्नाताई गवई यासुद्धा सध्या महानगरपालिकेच्या राजकारणात कोठेच सक्रीय नाहीत. त्यांच्यानंतर उज्वलाताई देशमुख महापौरपदी विराजमान झाल्या, त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर आज त्याही महापालिकेच्या राजकारणापासून कोसो दूर असल्याचे पहावयास मिळत आहे. महापालिकेच्या राजकारणात सातवे महापौर म्हणून कार्यभार सांंभाळणारे विजय अग्रवाल यांचाही कार्यकाळ नुकताच संपला असून, तेही हळूहळू मनपाच्या राजकारणापासून दूर जात असल्याचे चित्र आहे. महापौर पदावर विराजमान झालेल्या मागील सात महापौरांसारखाच अनुभव नुकत्याच महापौर झालेल्या अर्चना मसने यांच्या बाबतीत येणार की त्या या परंपरेला अपवाद ठरणार हे येणारा काळच सांगेल! दरम्यान, अकोल्याच्या महापौर पदात असे काय आहे, की महापौर पद गेल्यावर त्या व्यक्तीचे राजकारणातील अस्तित्वच संपून जाते, हादेखील एक संशोधनाचा विषय ठरावा!