The news is by your side.

नौदल अधिकाऱ्याचे अपहरण करून जिवंत जाळलं

0 1

नौदलात अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या सुरजकुमार मिथिलेश दुबे(वय – २७) यांचे अपहरण करून, तलासरी- वेवजीच्या जंगलात त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी(५ फेब्रुवारी) घोलवड पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. उपचारासाठी मुंबईला नेले जात असताना रस्त्यातच सुरजकुमार दुबे यांचा मृत्यू झाला.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडमधील रांची येथील मूळचे असलेले सुरजकुमार दुबे हे नौदलात २०१९ पासून कार्यरत होते. सध्या ते आयएनएस अग्रणी या नौकेवर कर्तव्यावर होते. ३० जानेवारी रोजी सुट्टी संपल्याने ते रांची येथून विमानाने निघाले होते. सकाळी नऊ वाजेच्या सुमारास चेन्नई येथे विमानतळावर पोहोचले असताना, तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्यावर पिस्तुल रोखलं व त्यांना जबरदस्ती एका वाहनात बसवून त्यांचे हात-पाय बांधले व त्यांच्याकडे १० लाख रुपयांची मागणी केली. मात्र सुरजकुमार दुबे यांनी ही रक्कम देण्यास नकार दिल्याने या तिन्ही अज्ञात व्यक्तींनी त्यांना चेन्नई येथे तीन दिवस डांबून ठेवले.
यानंतर त्यांना तेथून गाडीत बसवून तलासरी तालुक्यातील वेवजी येथील डोंगरावर आणले. या ठिकाणच्या जंगलात नेल्यानंतर त्या तिघांनी त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी जळत्या अवस्थेत सुरजकुमार हे जीवाच्या आकांताने पळत वेवजी गावाच्या हद्दीत पोहोचले. तिथून ग्रामस्थ व पोलिसांनी त्यांना रुग्णवाहिकेद्वारे उपजिल्हा रुग्णालय डहाणू येथे आणले. मात्र सुरजकुमार ९० टक्‍क्‍यांहून अधिक भाजल्याने त्यांना मुंबई येथील नौदलाच्या रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले असताना, रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी घडली आहे. ज्या तीन व्यक्तींनी सुरजकुमार यांचे अपहरण केले होते. ते संशयित असल्याचे त्यांनी त्यांच्या जबाबात म्हटल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.