The news is by your side.

भारतातून चीनला तस्करी केल्या जाणाऱ्या केसांचा ट्रक पोलिसांनी पकडला !

0 7

आयझॉल : सोने, चांदी, ड्रग्स तस्करीच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या आणि वाचल्या असतील. मात्र, चक्क माणसांच्या केसांच्या तस्करीचा (muggling of human hair) प्रकार कधी एकलाय का? कदाचित काल्पनिक वाटेल पण मिझोरम (Mizoram) येथून म्यानमार देशात केसांच्या तस्करीचा प्रकार समोर आलाय. मानवी केसांनी भरलेले 2 ट्रक आसाम रायफल्सने पकडले आहेत. या केसांची किंमत तब्बल 2 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. आसाम रायफल्सच्या सेरचिप बटालियनने चंपाई जिल्ह्यातील कस्टम विभागाची मदत घेत ही कारवाई केली. 

तस्करी केलेल्या केसांपासून चीनमध्ये विग निर्मीती

याविषयी मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार आंध्र प्रदेशमधील तिरुपती मंदिरातून केसांना गोळा करुन ते मिझोरम येथे आणण्यात आले. त्यानंतर हे केस मिझोरम येथून थेट म्यानमारमध्ये पठवण्यात येणार होते. म्यानमार येथे प्रक्रिया करुन ते पुन्हा चीनमध्ये विग बनवण्यासाठी पाठवण्यात येणार होते. मात्र, हा डाव आसाम रायफल्सच्या जवानांनी हाणून पाडला.

देशातील मंदिरांतून केसांना जमा करुन तस्करी

सूत्रांच्या माहितीनुसार फक्त तिरुपती बालाजी मंदिरच नाही तर देशातील अनेक धार्मिक स्थाळांमधून केसांना जमवून त्याची तस्करी केली जाते. देशात अनेक धार्मिक स्थळांवर प्रार्थना करुन भक्तगण आपले केस कापतात. नंतर हेच केस तस्करीसाठी वापरले जातात. मिझोरम य़ेथे तस्करीसाठी दोन ट्रक भरून केस आणण्यात आले होते. मात्र ऐनवेळी 23-सेक्टर आसाम रायफल्सच्या सेरचिप बटालियनने चंपाई जिल्ह्यातील कस्टम विभागाची मदत घेत ही केसांची तस्करी रोखली. या कारवाईत 120 बॅगमध्ये भरलेले तब्बल 50 किलो केस पकडण्यात आले. या केसांची किंमत तब्बल 2 कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे.

भारत आणि म्यानमार या देशांची सीमा खुली आहे. सीमेवर कोणतीही तटबंदी नाही. त्यामुळे या भागातून नार्कोटिक्स, सोनं, प्रातिबंधित प्राणी यांची येथे सर्रास तस्करी केली जाते. मात्र, यावेळी चक्क केसांची तस्करी झाल्यामुळे सीमेवर गस्त वाढवण्याची गजर निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे.