The news is by your side.

कांदा उत्पादनात किचिंत घट, यंदा विक्रमी धान्योत्पादन

0 40

नवी दिल्ली : देशात यंदा जूनमध्ये संपलेल्या पीक वर्षात (२०१७-१८) कांदा उत्पादनात काही प्रमाणात घट झाली आहे. गेल्या वर्षी (२०१६-१७) देशात २२४ लाख टन कांदा उत्पादन झाले होते. यंदा कांदा उत्पादन २२० लाख टनांवर पोचले असल्याचा अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयाने व्यक्त केला आहे.कृषी मंत्रालयाने यंदाच्या वर्षातील कांद्यासह एकूण फलोत्पादनाचा तिसरा अंदाज व्यक्त केला. देशात यंदा एकूण ३०६.८ दशलक्ष टन फलोत्पादन झाले आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत फलोत्पादनात २.०५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर गेल्या ५ वर्षाच्या सरासरीच्या तुलनेत हे उत्पादन ८.५ टक्क्यांनी अधिक असल्याचे कृषी मंत्रालयाने म्हटले आहे.देशातील फळांचे उत्पादन ९७ दशलक्ष टनांवर पोचले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे उत्पादन ४.५ टक्क्यांनी अधिक आहे. भाजीपाला उत्पादनातही १ टक्क्यांनी वाढ होऊन ते १७९.७ दशलक्ष टनांवर पोचले आहे.टोमॅटो उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत घट झाली आहे. यंदा १९४ लाख टन टोमॅटो उत्पादनाचा अंदाज आहे. गेल्या वर्षी २०७ लाख टन टोमॅटो उत्पादन झाले होते. बटाटा उत्पादन ४८५ लाख टनांवर स्थिरावले आहे. गेल्या वर्षी ४८६ लाख टनांवर उत्पादन पोचले होते. विविध राज्यांची कृषी आणि फलोत्पादन विभागांकडून मिळालेल्या माहितीनुसार पिकांच्या उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात असल्याचे कृषी मंत्रालयाने नमूद केले आहे.दरम्यान, देशात यंदा विक्रमी २८४.८३ दशलक्ष टन धान्योत्पादन झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. भात, गहू उत्पादनात वाढ झाली असल्याचे जाहीर केले आहे.