The news is by your side.

UP पोलिसांकडून राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचा गैरवापर; १२० पैकी ९४ प्रकरणं रद्द

0 1

उत्तर प्रदेशमधील योगी सरकारला अलाहाबाद उच्च न्यायालयाने राष्ट्रीय सुरक्षा काद्याच्या (एनएसए) मुद्द्यावरुन चांगलाच दणका दिला आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०२० दरम्यान एनएसए अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांसंदर्भातील याचिकांवर अलाहाबाद उच्च न्यायालयाने सुनावणी केली. या सुनावणीदरम्यान १२० पैकी ९४ प्रकरणं ही राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत येत नसल्याचं न्यायलयाने म्हटलं आहे. ९४ प्रकरणांसंदर्भात ३२ जिल्हाधिकाऱ्यांना न्यायलायने आदेश दिले असून एनएसएअंतर्गत दाखल करण्यात आलेला गुन्हे रद्द करुन अटक करण्यात आलेल्यांची मुक्तता करण्यास सांगितलं आहे. या निर्णयामुळे उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग केला जात असल्याच्या आरोपांना बळ मिळालं आहे. अगदी गोहत्येपासून ते सर्वसामान्य गुन्ह्यांसाठीही राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. यापैकी अनेक प्रकरणांमध्ये पोलिसांनी काहीही विचार न करता एनएसए लावल्याचं निरिक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार एनएसएअंतर्गत दाखल करण्यात आलेल्या एकूण प्रकरणांपैकी एक तृतीयांशहून अधिक प्रकरण ही गोहत्येशी संबंधित आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी हे अल्पसंख्याक समुदायातील आहेत. जिल्हा प्रशासनाने प्राथमिकतेच्या आधारे या व्यक्तींविरोधात गोहत्येसंदर्भातील गुन्हे दाखल केले होते. यापैकी ३० प्रकरणांमधील एनआयएचं कलम हटवण्याचं आदेश न्यायालयाने दिलेत. तसेच सर्व अटक करण्यात आलेल्या व्यक्तींना सोडून देण्यास सांगितलं आहे.