पातूर शहरात वरली मटक्यांच्या धंद्यांना उधाण!
अकोला : ७एप्रिल पातूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या पातूर शहरात वरली मटक्यांच्या धंद्यांना उधाण आले असून,या अवैध वरली मटक्यांच्या धंद्याला शहर टाऊन चे बिट ए.एस.आय यांचे अभय असल्याचे दिसून येत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन असूनही, पातूर शहरात मात्र खुलेआम वरली मटक्यांच्या धंद्यामुळे गर्दी होत असल्याने, एक प्रकारे कोरोनाच्या आजाराला खतपाणी घालण्याचे काम सुरू असल्याचे एकंदरीत चित्र निर्माण झाले आहे. दैनिक राजयोन्नतीच्या प्रतिनिधीने पातूर शहरातील बंद पडलेल्या सिनेमागृहा जवळ जाऊन,वरली मटक्यांच्या सुरू असलेल्या धंद्याचे चित्रीकरण छुप्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, पातूर शहरातील विजय टॉकीज जवळ नगर परिषदेच्या भींतीला लागून एक वरली मटक्यांच्या धंदा असून,या धंद्याला पातूर शहर बिटचे ए एस आय यांचे अभय असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे.यामुळे कोरोनाच्या आजाराला ब्रेक लावण्यासाठी राज्य शासनाने लावून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होत आहे.खुद्द अकोल्याचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन होत नसूनही याकडे पातूर पोलीस दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. एकीकडे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची विक्री करण्यासाठी गर्दी होत असल्याच्या कारणावरून पोलिसांकडून अडथळा केला जात आहे, तर दुसरीकडे मात्र वरली मटक्यांच्या धंद्याला सुरू ठेवण्यासाठी पातूर पोलीस मूक संमती देत असल्याने, आश्चर्य व्यक्त केला जात आहे.या गंभीर बाबीकडे जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी लक्ष घालून, या सर्व प्रकाराला बंद करण्याची मागणी केली जात आहे. याबाबतीत जिल्हा पोलीस अधीक्षक काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.