The news is by your side.

दलित मराठा ऐक होणे ही काळाची गरज!

0 90

आगामी लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष भाजप सोबत राहणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी ( एन डी ए ) चा घटक पक्ष म्हणून देशभर रिपब्लिकन पक्ष भाजपसोबत युती करणार आहे. महाराष्ट्रात भाजप शिवसेना रिपब्लिकन पक्ष अशी महायुती होणे अपेक्षित आहे. शिवसेना सोबत आली नाही तरी राज्यात आणि संपूर्ण देशात रिपब्लिकन पक्ष भाजपला समर्थन देणार आहे.यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे पहिले उद्दिष्ट्य आहे की रिपब्लिकन पक्षाचे दोन उमेदवार आम्हाला लोकसभेत निवडून आणायचे आहेत. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला मान्यता मिळून स्वतंत्र निवडणूक चिन्ह मिळेल. त्याचा फायदा रिपब्लिकन पक्षाच्या पुढील राजकीय वाटचालीत मिळणार आहे. सध्या रिपब्लिकन पक्ष संपूर्ण देशात कार्यरत आहे. प्रत्येक राज्यात रिपब्लिकन पक्षाच्या शाखा कार्यरत आहेत. अगदी ईशान्य भारतातील मिझोराम;अरुणाचल प्रदेश; हिमाचल प्रदेश; ओरिसा;आसाम; नागालँड; सिक्कीम; मणिपूर या राज्यांमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या शाखांची स्थापना झाली असून दादरा नगरहवेली अंदमान निकोबार पॉंडीचेरी या केंद्र शासित प्रदेशात ही रिपब्लिकन पक्ष पोहोचला आहे. त्यामुळे संपूर्ण देशात रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून दलित मतदार प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजप आणि एनडीए च्या सरकारला निवडून आणून पुन्हा देशसेवेची संधी देणार आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शासनकर्ती जमात बनण्याचा;सत्ता हाती घेण्याचा संदेश दिला आहे. गरिबांचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्तेसोबत राहिले पाहिजे. हे सूत्र स्वीकारून आमचे आगामी निवडणुकीचे व्हिजन हे दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी; गरिबांचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्तेसोबत राहण्याचे आहे. आम्ही सत्तेत सरकार मध्ये असलो तरी समाजाच्या प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही नेहमी समाजहिताची भूमिका घेतली आहे. मागील विजयादशमीला नागपूर मध्ये आपण ऍट्रोसिटी धक्का लागला तर मंत्रिपदाचा त्याग करीन असा ईशारा दिला होता. अनेक प्रश्नांवर आपण समाजहिताची खंबीर भूमिका घेतली आहे. संविधानाचे रक्षण ;पदोन्नतीमधील अनुसूचित जाती जमाती चे आरक्षण; आरक्षणाचे संरक्षण; ऍट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण या प्रश्नांवर आपण समाजाच्या पाठीशी खंबीर उभे राहण्यासाठी आपण सरकार मध्ये आहोत. आगामी काळात ही सत्तेसोबत राहून समाजाचे प्रश्न सोडविणार आहोत. आपण कुणावरही टीका न करता आपले काम करीत राहणार आहोत. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा संकल्पनेतील व्यापक सर्वसमावेशक रिपब्लिकन पक्ष साकार करण्याचे काम आपण करीत आहोत. दलित सवर्ण यांच्यातील दरी मिटविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.रिपब्लिकन पक्ष देशभर दलित सवर्ण यांची एकजूट उभारणार आहे. महाराष्ट्रात दलित आणि मराठा ऐक्य ही काळाची गरज आहे. त्यासाठी आम्ही सर्वप्रथम मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे. राज्यात रिपब्लिकन पक्षाने शिवशक्ती भीमशक्ती भाजप महायुती चा प्रयोगही केला आहे. त्यास चांगले यश मिळत आहे. जय भीम ; जय महाराष्ट्राची घोषणा दोन्ही समाज एकजुटीने देत आहे. मराठा समाज आरक्षणासाठी लढत आहे. मात्र त्यांना अद्याप हवं तेव्हढं यश मिळालेलं नाही. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याला दलितांची साथ मिळावी हा माझा प्रयत्न राहिला आहे. मंडल आयोगाच्या शिफारशी लागू होऊन ओबीसींना आरक्षण न्याय हक्क मिळावेत म्हणून ओबीसींऐवजी मोठया प्रमाणात दलितांनी पुढाकार घेतला होता. इतर मागासवर्गीयांना ( ओबीसी ) आपण स्वतः मागसावसर्गीय आहोत आणि आपल्या हितासाठी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू होणे आवश्यक आहेत. आपल्या हितासाठी दलित लढत आहेत याची ओबीसींना तेंव्हा फारशी जाणीव नव्हती. ओबीसींचे हातावरच्या बोटावर मोजण्या इतक्या नेत्यांनाच दलितांनी ओबीसींना दिलेल्या पाठिंब्याची जाणीव होती. ओबीसींच्या आरक्षणाच्या लढ्याला जशी अनमोल साथ दलितांनी दिली तशीच साथ मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाला दलितांनी दिली पाहिजे. त्यामुळे दलित मराठा दोन्ही समाजाचे खरे मनोमिलन होईल. मराठा समाज आता आपल्या हक्कांसाठी जागृत झाला आहे.त्यामुळे त्यांना त्यांच्या हक्काच्या लढाईत साथ देणाऱ्या दलितांबद्दल नक्कीच ते मैत्रीचा हात पुढे करतील. आमचा तथागत भगवान बुद्धांच्या शिकवणीनुसार वैराला अवैराने ;प्रेमाने मैत्रीने जिंकण्याचा प्रयत्न राहिला आहे. त्यामुळे आम्हाला दलित मराठा यांच्यात दरी कमी करून मैत्री ऐक्य स्थापन करायचे आहे. राज्यात रिपब्लिकन पक्षाची वाटचाल मजबूत करण्यासाठी दलित मराठा ऐक्य होणे आवश्यक आहे. केवळ दलितांच्या मतदानावर रिपब्लिकन राजकारणाला यश मिळू शकत नाही. त्यामुळे रिपाइंची एकजातीय प्रतिमा बदलण्यासाठी दलित आदिवासी ओबीसिंसह राज्यात मराठा समाजाला सोबत घ्यावे लागेल. संपूर्ण देशात दलित सवर्ण यांची एकजूट उभारावी लागेल. दलित आदिवासी आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्र प्रवर्ग करून आर्थिक निकषावर मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे. त्यासाठी आरक्षणाची मर्यादा वाढवून 75 टक्के करण्यात यावी . त्यात 25 टक्के आरक्षण हे आर्थिक मागासवर्गीयांसाठी ठेवण्यात यावे.त्यासाठीची घटना दुरुस्ती करून संसदेत कायदा केला पाहिजे. त्यामुळे मराठा समाजसह ब्राह्मण ; लिंगायत आदी सवर्ण जातींना आरक्षणाचा लाभ होईल. तसेच देशभरातील गुज्जर; जाट; राजपूत; आदी सवर्ण जातींतील आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना आरक्षण मिळेल. ही रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे. यापद्धतीने सवर्णांना आरक्षण मिळाल्याने आरक्षणावरून दलितांचा होणारा द्वेष आणि होणारे अत्याचार कमी होतील. जास्तीत जास्त जातींना आरक्षण मिळाल्यास आरक्षणावरून होणारे वाद मिटतील. प्रकाश आंबेडकर यांनी खासदार असुद्दीन ओवैसी यांच्या एम आय एम सोबत केलेल्या युतीचा फायदा भाजप रिपाइं युतीलाच होणार आहे. ओवैसी हे हार्डलाईन वापरणारे नेते आहेत. त्यांचीच भाषा प्रकाश आंबेडकर आता बोलू लागल्याने त्यांनी वंदे मातरम ला विरोध केला आहे.या पूर्वी दलित मुस्लिम एकजुटीचा प्रयोग जोगेंद्र कवाडे आणि हाजी मस्तान यांनी केला होता. मात्र पुढे त्या युतीला यश आलेले नाही असा इतिहास आहे. रिपब्लिकन पक्षाच्या निळ्या झेंड्याखाली दलित आदिवासी मुस्लिम ओबीसी मराठा ब्राह्मण सवर्ण सर्व समाज घटकांची एकजुट उभारून डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपाइं साकार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. माझा पक्ष हार्डलाईन वापरून कोणावरही टीका करणारा पक्ष नाही. जातीजातींना जोडण्याचे विचार आम्ही पेरत आहोत. भीमकोरेगाव प्रकरणामुळे राज्यभर दलित मराठा वाद निर्माण झाला असता मात्र दोन्ही समाजाने संयम दाखविल्याने ती आग तेथेच विझली.भीमकोरेगाव हल्ल्याच्या निषेधार्थ आंबेडकरी जनतेने दि 3 जानेवारी रोजी स्वयंस्फूर्तपणे पुकारलेला महाराष्ट्र्र बंद तुफान यशस्वी झाला. त्या बंदवेळी संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाने शांतता पाळून अनमोल सहकार्य केले. भीमकोरेगाव घडण्यापूर्वी आम्ही राज्यभर गावागावात दलित मराठा ऐक्याचा नारा दिला होता. शिवशक्ती भीमशक्ती भाजप महायुती च्या राजकीय प्रयोगाने दलित मराठा एकजुटीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र भीमकोरेगाव प्रकरणानंतर राज्याचे वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. मराठा समाज बहुसंख्य सधन आहे. शेतजमिनी;बागायत; पशुधन; दूध डेअरी; साखर कारखाने;सूतगिरणी; शाळा; कॉलेज;पतपेढी; बँक ; नोकरशहा;आमदार; खासदार मंत्री; ग्राम पंचायत; जिल्हा परिषद ;ते राज्यातील सत्ता बहुसंख्य मराठा समाजाच्या हाती असताना ;या समाजाची राज्यात 32 टक्के लोकसंख्या असताना या समाजाला कशासाठी हवे आहे ओबीसी मध्ये आरक्षण असा विरोधी मतप्रवाह सुरू आहे. सरकार विरोधात प्रचार करताना संविधान बदलणार ;दलितांचे आरक्षण संपविणार असा खोटा प्रचार सुरू आहे.यातुन समाजात संभ्रम निर्माण करून जाती जातींच्या भिंती अधिक मजबूत करून भेदभाव वाढविण्यास सामाजिक कटुत्व वाढविण्यास विरोधकांचे राजकारण कारणीभूत ठरत आहे.आम्ही मात्र दलित मराठा आणि सर्व सवर्णांचे ऐक्य घडवून समताधिष्टीत निकोप समाज घडविणार आहोत. भीमकोरेगाव प्रकरणानंतर समाज माध्यमांमध्ये एकमेकांवर टीका टिप्पणी एव्हढी होत आहे की आंबेडकरी समाजाला अन्य समाज समूहांपासून वेगळे पडण्याचा प्रयत्न होत आहे. ते रोखण्यासाठी आमची नेहमीच सामाजिक ऐक्याची भूमिका राहिली आहे. दलित मराठा या दोन समाजातील दरी संपविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष निम्म्या जागा या दलितेतर सवर्ण जातींना देणार आहे. सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा महायुतीतुन रिपब्लिकन पक्षाला मिळणार आहे. त्या जागेवर रिपाइं ची उमेदवारी उदयनराजेंना देण्याचा आमचा प्रस्ताव आहे. उमेदवारीचा रिपाइं चा प्रस्ताव जर उदयनराजेंनी स्वीकारला तर संपूर्ण राज्यात चांगला संदेश जाईल.रिपाइंची उमेदवारी स्वीकारून उदयनराजे महाराष्ट्र्राला दलित मराठा ऐक्याचा संदेश देऊ शकतील. त्यातून राज्यात सामाजिक ऐक्याचा संदेश जाईल. रिपब्लिकन पक्षाची सुद्धा एकजातीय प्रतिमा पुसली जाईल. खऱ्या अर्थाने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील व्यापक सर्वसमावेशक रिपब्लिकन पक्ष साकारला जाईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अनेक चांगल्या योजना राबण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील महिलांना वरदान ठरलेली उज्ज्वला योजना; तसेच मुद्रा कर्ज योजना; प्रधानमंत्री आवास योजना; त्याचप्रमाणे नीतून गडकरी यांच्या मंत्रालयामार्फत 10 लाख करोड पेक्षा अधिक निधी रस्ते विकासासाठी देण्यात आला आहे. देशात अनेक भागात सहा पदरी; चार पदरी महामार्ग तयार होत आहेत. समाजिक न्याय मंत्रालयाने ऍट्रॉसिटी कायदा अधिक सक्षम केला आहे. विशेष घटक योजने अंतर्गत दलितांच्या विकासासाठी सामाजिक न्याय मंत्रालयाने 55हजार 619 कोटी च्या निधीची तरतूद केली आहे.दिव्यांगाजनांना शिक्षणात 4 टक्के आरक्षण आणि नोकरीमध्ये 5 टक्के पर्यंत आरक्षण वाढविले आहे. ओबीसी कमिशन ला घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकांचे पंचतीर्थ उभारण्यात आले आहे. नविदिल्लीतील 26 अलीपुर रोड ही महामानवाची निर्वाणभूमी; महू येथील जन्मभूमी; मुंबईतील चैत्यभूमी नजीक चे इंदूमिलमधील स्मारक; लंडन मधील हेन्री रोडवरील स्मारक; आणि नागपुरातील दीक्षाभूमी या पंचितीर्थांचा विकास करण्यात येत आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांचा आंबेडकरी जनतेचा जिव्हाळ्याचा विषय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सोडविला आहे. त्यामुळे आंबेडकरी जनता संपूर्ण देशभरात मोदींच्या नेतृत्वातील भाजप एनडीए सरकारला मतदान करणार आहे. दलितांच्या मतदानाच्या बळावर मोदी सरकार आगामी लोकसभा निवडणूक निवडणुकीत 300 पेक्षा अधिक जागा जिंकेल असा विश्वास ना रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. मोदी सरकार पुन्हा सत्तेवर येणार असून रिपब्लिकन पक्ष सत्तेत सहभागी होऊन आगामी काळात दलितांमध्ये आर्थिक क्रांती घडविणार आहे. दलित आदिवासी बहुजन तरुणांना स्वयंरोजगार ; व्यवसाय निर्माण करण्यास प्रोत्साहन देऊन उद्योजक निर्माण करणार आहोत.त्यामुळे आंबेडकरी जनतेचे मतदान प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे सरकार पुन्हा केंद्रात निवडून देईल असा मला विश्वास आहे.

शब्द संकलन :-हेमंत रणपिसे,9004488465,मुंबई