The news is by your side.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर भारताचे भाग्यविधाते. ना. रामदास आठवले.

0 115

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ; बोधिसत्व ; महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 62 व्या महापरिनिर्वाणदिनी त्यांच्या क्रांतिकारी स्मृतींना विनम्र अभिवादन! विषमतेच्या विषवल्लीने ग्रासलेल्या भारतीय संस्कृतीला समतेची संजीवनी देणारे दिग्विजयी नेते;भारताचे भाग्यविधाते; प्रज्ञासूर्य;डॉ बाबासाहेब आंबेडकर विश्वव्यापी ज्ञानसूर्य ठरले आहेत. त्यांच्या कर्तृत्वाची उंची हिमालयाहुन ऊंच ठरली आहे.दरवर्षी 6 डिसेंबरला देशाच्या कानाकोपऱ्यातून कोटयावधी आंबेडकरी जनता मुंबईत दादरच्या चैत्यभूमीवर येऊन आपल्या प्राणप्रिय मुक्तीदात्याला…. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना विनम्रभावे अभिवादन करते! नतमस्तक होते ! भीमसैनिकांचे लाखोंचे थवे च्या थवे चैत्यभूमीवर मिनिटा- मिनिटाला थडकून नतमस्तक होतात. अरबी समुद्राच्या लाटांना भीमसैनिकांच्या लाटा मागे सारतात. आपल्या मुक्तीदात्याला अंतःकरणपूर्वक वंदन करतात. चैत्यभूमीवर दिसणारी ही कोट्यवधी माणसांची गर्दी दरवर्षी आपल्या मनाने येते आणि मनाने शिस्तपूर्ण जाते. कोणत्याही निमंत्रणाशिवाय ही गर्दी येते. या गर्दीला जीवनमार्ग दाखविण्यासाठी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले ग्रंथसंपदा आहे. या वेळी आलेले लाखो भीमसैनिक ग्रंथ खरेदी करतात. विचारांची ही जागृती आंबेडकरी समाजात अखंड सुरू आहे. ही विचारांची जागृती आंबेडकरी समाजातून मशालीने मशाल पेटवावी तशी आंबेडकरी समाजातील वैचारिक जागृती बहुजन समाजात पोहोचली आहे.महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण जीवन प्रचंड संघर्षावर आधारलेले आहे. त्यांनी हजारो वर्षांच्या व्यवस्थेशी संगर केला. त्यांनी उभारलेला समतेचा लढा मानवमुक्तीचा लढा म्हणून जगभर आदर्श ठरला आहे. जगभरातील समतेच्या ; मानवाधिकार चळवळीला प्रेरणा आंबेडकरी विचारातूनच मिळते. अमेरिकेतील कोलंबिया विश्वविद्यापीठात ते शिकले.त्या विद्यापीठात त्यांचा पुतळा उभारण्यात आला असून ज्ञानाचे प्रतीक म्हणुन त्यांचा गौरव करण्यात आला आहे. मनुस्मृतीवर आधारित चातुरवर्ण आणि त्यातून हिंदुधर्मात आलेली स्पृश्य अस्पृश्यता; जातीभेद. या भेदभावाचे दाहक चटके सोसून ही महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्मावर कोणताही सूड न उगविता उलट हिंदू धर्मात सुधारणा घडविण्यासाठी हिंदू कोड बिल लिहिले. हिंदू धर्मातील विषमता नष्ट करून समतेचे उद्दिष्ट्य साध्य करण्याचा मार्ग दिला. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणून त्यांनी हिंदू कोड बिल तयार केले मात्र ते मंजूर झाले नाही म्हणून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केंद्रीय कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जाती धर्माच्या महिलांना ; बहुजनांना न्याय मिळवून दिला.कामगारांना साप्ताहिक सुट्टी पासून अनेक अधिकार मिळवून दिले.कोकणातील खोती पद्धत नष्ट करून तेथील भूमिपुत्रांना न्याय मिळवून दिला. शिका संघटित व्हा संघर्ष करा हा त्यांचा संदेश केवळ दलितांसाठी उपयुक्त ठरला नसून प्रगती करू इच्छिणाऱ्या सर्व समाजघटकांना उपयोगी ठरला आहे. बौद्धांनी शिक्षणाच्या बळावर मागील 60 वर्षांत प्रचंड प्रगती केली. ती अन्य समाज घटकांना प्रोत्साहन देणारी ठरली आहे. त्यामुळे अन्य समाजघटकांत शिक्षणाचे प्रमाण वाढत आहे. बौद्धांची प्रगती शिक्षण नोकरी आणि राजकीय आरक्षणाच्या बळावर झाली अशी धारणा अन्य समाजघटकांत झाली. आम्हाला आरक्षण मिळत नाहीत दलितांना आरक्षण मिळते या भावनेतून दलितांवर अत्याचार झाल्याचे प्रकार घडले आहेत. आरक्षण हा आज देशात कळीचा मुद्दा झाला आहे.कधी काळी सवर्ण जातींना आरक्षण मागणे म्हणजे मागासवर्गीय दलित हीन असे स्वतःला म्हणवून घेणे असा गैरसमज सवर्णांतून होत होता. आता मात्र देशभरातील सवर्ण उच्चवर्णीय समाज स्वतःला मागासवर्गीय सिद्ध करून आरक्षण मागत आहे.त्यात राज्यातील मराठा समाज ;ब्राह्मण समाज ही आरक्षण मागू लागला आहे. देशभरातील विविध राज्यांतील जाट ; गुज्जर; राजपूत; पटेल आदी सवर्ण जाती आरक्षण मागू लागले आहेत. दलितांची आरक्षणातून झालेली प्रगती पाहून देशभरात आरक्षणाचा किमयागार आरक्षणाचे प्रणेते म्हणून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना सर्व वंदन करू लागले आहेत. राजर्षी शाहू महाराजांनी 1901 मध्ये कोल्हापूर संस्थानात सर्वप्रथम आरक्षणाचे तत्व लागू लागू केले.त्या आधी महात्मा ज्योतिबा फुलेंनी आरक्षणाची संकल्पना मांडली होती. तेच तत्व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात आणले. दलित आदिवासींना सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून संविधानिक अधिकार म्हणून आरक्षण त्यांनी मिळवून दिले.आता आरक्षण मिळविण्यासाठी झगडणाऱ्या मराठा समाजाला आरक्षणाचे महत्व कळले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ज्ञानकौशल्याने अगदी सहज; रक्ताचा एक थेंबही न सांडता आरक्षणाची कवचकुंडले दलित आदिवासींच्या ओंजळीत टाकली. त्यांचे हे उपकार कधीही फिटू शकत नाहीत. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ दलित आदिवासींच्या हिताचा विचार केला नाही तर देशातील प्रत्येक समाज घटकांच्या हिताचा विचार केला. त्याचे प्रतीक भारतीय संविधान आहे. जगातील सर्वश्रेष्ठ ठरलेले भारतीय संविधान ही केवळ महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्ञानाची देशाला मिळालेली सर्वोत्तम भेट आहे.संविधानामुळेच भारताची वाटचाल प्रगतीकडे आहे. भारताची लोकशाही मजबूत उभी आहे. संविधान लागू होण्यापूर्वी मनुस्मृतीचे राज्य अनेकांच्या मनात होते. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले. विषमतेवर समतेचा विजय व्हावा यासाठी मनुस्मृती गाडून देशात संविधानाची भीमस्मृतीचे युग सुरू झाले. संविधानातून सामाजिक न्याय ; समता ; विश्वबंधुत्व; राष्ट्रीय एकात्मता सर्वधर्मसमभाव ही मूल्ये त्यांनी देशात रुजविली. गरीब श्रीमंत उच्च नीच हे भेदभाव संविधानामुळे मिटविणारी लोकशाही देशात नांदत आहे. गरीब आणि श्रीमंत सर्वांच्या मताला एकच मूल्य ठरविणारी राजकीय समता डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात यशस्वी करून दाखविली. त्यांना भारतात सामाजिक आणि आर्थिक समता स्थापन करायची होती.ते उद्दिष्ट्य त्यांना साध्य करायचे होते.भारत जगात सर्वश्रेष्ठ महासत्ता ठरणारे प्रगत राष्ट्र व्हावे. जगाला युद्धाची नाही बुद्धांची गरज आहे असे सांगताना भारत बौद्धमय व्हावे हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्वप्न पाहिले होते. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जगाला कार्ल मार्क्सची की बौद्धांच्या विचारांची गरज आहे यावर तुलनात्मक लेखन करून जगासमोर हे सिद्ध केले आहे की जगाला कार्ल मार्क्स नाही तर बुद्धांची गरज आहे. आता मात्र आंबेडकरी समाजात अनेक मार्क्सवादी लोक कार्ल मार्क्सचे तत्वज्ञान शिकविण्यासाठी घुसले आहेत. पण गेली 60 वर्षे मर्क्सवाद्यांनी कितीही प्रयत्न केले तरी आंबेडकरी समाजातील भीमसैनिक आंबेडकरी तत्वज्ञान सोडून अन्य विचारांना भुलले नाहीत हे ही सत्य आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी समाजात शिक्षणाला सर्वोच्च महत्व देऊन शिक्षणप्रसारासाठी द पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.मानवी जीवनात बौद्ध धम्माला सर्वोच्च महत्व देऊन भारतात बौद्ध धम्माच्या प्रसारासाठी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना केली तसेच समाजाला शासनकर्ती जमात व्हा असा संदेश देऊन राजकारणात प्रबळ सर्वसमावेशक राजकीय पक्ष म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची संकल्पना त्यांनी मांडली. एकजातीय संघटन म्हणून शेड्युल्ड कास्ट फेडरेशन बरखास्त करण्याचा आणि रिपब्लिकन पक्षाचा विचार त्यांनी मांडला होता.खुले पत्र लिहून रिपब्लिकन पक्षाची व्यापक संकल्पना त्यांनी मांडली. त्यानुसार सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून व्यापक प्रबळ रिपब्लिकन पक्ष उभा करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे. सर्व समाज घटकांना जोडण्यासाठी आम्ही दलित सवर्ण एकजुटीचा भूमिका घेतली आहे. शिवशक्ती भीमशक्ती एकजुटीचा राजकीय प्रयोग त्यासाठीच होता.त्यातूनच आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित संविधानातील भारत उभारण्यासाठी समता बंधुता स्वातंत्र्य न्याय राष्ट्रीय एकात्मता या तत्वांचा अंगीकार करून सामाजिक ऐक्य साधत पुढे गेले पाहिजे. रिपब्लिकन गटांचे ऐक्य झाले पाहिजे. स्वतःला सर्वश्रेष्ठ समजण्याची हुकूमशाही पद्धत सोडून लोकशाही पद्ध्तीने रिपब्लिकन ऐक्यात बहुमताने निर्णय घेतले पाहिजेत.रिपब्लिकन ऐक्य झाले तर अन्य अल्पसंख्यांक समाज ; बहुजन समाज सर्व समाजघटक रिपब्लिकन ऐक्याला पाठबळ देऊन सर्वंकष रिपब्लिकन पक्षाचे नेतृत्व स्वीकारून डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित सर्वसमावेशक रिपब्लिकन पक्ष साकारला जाऊ शकतो.त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत.ऐक्यासाठी आम्ही नेहमीच पुढाकार घेतला आहे. आता नेत्यांच्या गटांच्या ऐक्या बरोबरच सर्व समाजाचे ऐक्य झाले पाहिजे .त्यातूनच महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे वैचारिक विश्व साकारत येईल. मी प्रथमतः भारतीय आहे आणि अंतिमतः देखील भारतीयच आहे हा त्यांचा प्रखर राष्ट्रभक्तीचा विचार त्यांनी आम्हाला शिकविला आहे.त्यांच्या स्वप्नातील ; संविधानातील भारत घडविण्यासाठी प्रयत्नशील राहणे हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल!